नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिलला दहशतवादी हल्ला झालेला. त्यानंतर भारताने पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवली. भारताने ऑपरेशन सिंदूर चालवून पाकिस्तानातील दहशतवादी तळ नष्ट केले. त्यानंतर दोन्ही देशात तणावाची स्थिती निर्माण झाली. त्याचा परिणाम क्रीडा क्षेत्रावरही झाला. पहलगामच्या घटनेनंतर 14 सप्टेंबरला आशिया कप 2025 मध्ये पहिल्यांदा भारत-पाकिस्तानचे संघ दुबईत आमने-सामने असतील. या सामन्याला भारतातून खूप विरोध होतोय. हा सामना रद्द करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. तात्काळ सुनावणी घेण्याची मागणी केली आहे. त्यावर सुप्रीम कोर्टाने तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. सुप्रीम कोर्टाने विचारलय इतकी घाई कशाला? सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामन्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आशिया कप टुर्नामेंटमध्ये 14 सप्टेंबरला भारत-पाकिस्तान दरम्यान होणारा सामना रद्द करावा या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका दाखल करणाऱ्याने दावा केलेला की, हा सामना रविवारी आहे. जर,ही याचिका शुक्रवारी सूचीबद्ध केली नाही,तर याचिका वाया जाईल. त्यावर न्यायमुर्ती जेके माहेश्वरी आणि न्यायमुर्ती विजय बिश्नोई यांच्या पीठाने म्हटलं की, “यात इतकी घाई करण्यासारखं काय आहे? सामना रविवारी आहे. आम्ही यात काय करु शकतो?.होऊ दे सामना. मॅच झाली पाहिजे” त्यावर वकीलाने म्हटलं की, भले माझा विषय खराब असेल, पण कृपया सूचीबद्ध करां. त्यावर बेंचने नकार दिला.
कोणी दाखल केलेली याचिका?
उर्वशी जैन यांच्या नेतृत्वाखाली चार कायद्याच्या विद्यार्थ्यांनी ही जनहित याचिका दाखल केली होती. पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानसोबत क्रिकेट मॅचच्या आयोजनातून राष्ट्रीय प्रतिष्ठा आणि जनभावनेच्या विरोधात संदेश जातो असा मुद्दा याचिकाकर्त्यांनी मांडला होता.
दोन देशांमध्ये क्रिकेट हे सद्भाव आणि मित्रता दाखवण्यासाठी असतं. पण पहलगाम दहशतवादी हल्ल्यामध्ये आमचे लोक शहीद झाले. ऑपरेशन सिंदूरमध्ये आमच्या सैनिकांनी प्राणांची बाजी लावली. अशावेळी पाकिस्तान विरुद्ध सामन्यातून एक चुकीचा संदेश जाईल असं याचिकाकर्त्याच म्हणणं होतं.
‘सिंदूर रक्षा अभियान’
14 सप्टेंबरला होणाऱ्या या सामन्यावरुन देशात जोरदार राजकारण सुरु आहे. शिवसेना (UBT) चे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. एका प्रेस कॉफ्रेंसमध्ये त्यांनी म्हटलं की, आम्ही या सामन्याला विरोध करणार. विरोध म्हणून आम्ही ‘सिंदूर रक्षा अभियान’ चालवणार आहोत. यावेळी महिला रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील.